मुंबई (प्रतिनिधी) गेल्या वर्षभरात राज्यात एक लाख बांगलादेशी नागरिकांना जन्माचे दाखले देण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, आणि या संदर्भात चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केले आहे. तसेच, जन्म दाखले वितरणावर उशिराने स्थगिती घालण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालयात ४ हजार अपात्र बांगलादेशी मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. त्यानुसार तपास करून, या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले. शासकीय कामकाजात गंभीरता न दर्शवून जन्म दाखले देण्याचा ठपका एसआयटीने त्यांच्यावर ठेवला आहे.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात सर्च ऑपरेशन्स राबवून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच, सोमय्यांनी राज्यातील २० जिल्ह्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे.