मुंबई (प्रतिनिधी) बदलापूर येथील दोन शाळकरी अल्पवयीन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, आरोपीच्या मृत्यूसाठी पाच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे. ठाण्याचे न्यायदंडाधिकारी अशोक शेंडगे यांनी हा अहवाल सोमवारी उच्च न्यायालयात सादर केला.
अहवालात, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, हेड कॉन्स्टेबल अभिजीत मोरे, हरीश तावडे आणि पोलीस वाहनचालक सतीश खाटळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने यावर दखल घेतली असून, दोन आठवड्यांत तपास यंत्रणा कोणती असावी, यावर सरकारकडून भूमिका मागवली आहे. न्यायालयाने याबाबत शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या वकिलांना चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
डॅश कॅमेऱ्याद्वारे वाहनाचे चित्रीकरण आवश्यक
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, पोलिसांसाठी खबरदारीच्या काही महत्त्वपूर्ण सूचना न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालात दिल्या आहेत. त्यानुसार, कोठडीतील आरोपीला दुसऱ्या ठिकाणी नेताना वाहनातील डॅश कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. या चित्रीकरणाची जबाबदारी वाहन चालकावर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर, चित्रीकरण सुरू आहे का आणि कॅमेरा कार्यान्वित आहे का, याची तपासणी आरोपीला इतर ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने करावी. कॅमेरा कार्यान्वित नसल्यास, चालक आणि संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांना त्वरित सूचित करून तो दुरुस्त करावा, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय होता कुटुंबीयांचा दावा
अक्षयची चकमक बनावट असल्याचा दावा करून त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या चकमकीची न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते.
अहवालात काय?
बनावट चकमकीद्वारे अक्षयला ठार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला, तर आरोपीने एका अधिकाऱ्याचे पिस्तुल हिसकावून गोळीबार केल्यामुळे, स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडल्याचा दावा पोलिसांचा होता. ही कथित चकमक चालत्या गाडीत झाल्यामुळे अक्षयसह वाहनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करणे योग्य होते का? असा प्रश्न आपल्यासमोर असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे. चौकशीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपीसह वाहनात असलेले चार पोलीस परिस्थिती हाताळण्याच्या स्थितीत होते.
शिवाय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, आरोपीने हिसकावलेल्या पिस्तुलावर त्याच्या हाताचे ठसे आढळले नाहीत. आरोपीने गोळीबार केल्याची
कोणतीही चिन्हे त्याला घातलेल्या बेड्या व कपड्यांवर आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करणे योग्य नव्हते, हे स्पष्ट होऊन स्वसंरक्षणार्थ आरोपीवर गोळीबार केल्याच्या पोलिसांच्या दाव्याबाबत संशय निर्माण करते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानेही आरोपीच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यालाच पुष्टी मिळते. या चकमकीबाबत संशय निर्माण करणाऱ्या अनेक बाबी असून हे पाच पोलीस आरोपीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवला आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार
अक्षय शिंदेचे वकील पाच पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खंडपीठाने सोमवारी दिलेल्या आदेशानंतर संबंधित पोलिसांची पळापळ सुरू झाली आहे. मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करेल आणि एफआयआर नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे म्हटले आहे. यामुळे संजय शिंदे, हरीश तावडे, निलेश मोरे, अभिजीत मोरे आणि सतीश खताळ अशा पाच जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.