पैसे मागण्यासाठी मित्रावर धारदार विळ्याने वार ; गुन्हा दाखल !
जळगाव (प्रतिनिधी) उसनवारीने दिलेले पैसे मागण्यासाठी आलेल्या तरुणाने मित्राच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने संतापाच्या भरात तरुणावर धारदार विळ्याने वार केल्याची घटना शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात घडली. दरम्यान, वार करणारा संशयित धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर) हा स्वतःहून पोलिस स्टेशनला जमा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणारा मोहीत सुनिल चौधरी (वय २४) हा एमाआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीत धीरज पाटील हा देखील कामाला असून दोघांची चांगली मैत्री होती. काही दिवसांपुर्वी धिरजने मोहीतकडून पाच हजार रुपये उसनवारीने घेतले होते, तर त्यापैकी चार हजार रुपये त्याने परत दिले होते. उर्वरीत एक हजार रुपयांसाठी मोहीतने धीरजकडे तगादा लावला होता. मंगळवार दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास मोहीतने धीरजला पैशांसाठी फोन केला असता, धीरजने पैसे घेण्यासाठी मोहीतला पैसे घेण्यासाठी घरी बोलावले. मंगळवारी दुपारी मोहीत हा पैसे घेण्यासाठी अयोध्या नगरातील हनुमान नगरात धीरजच्या घरी गेला. त्याठिकाणी मोहीतने धिरजच्या कानशिलात लगावली. त्यानंतर धीरज हा घरात गेला असता, त्याठिकाणी देखील मोहीतने धीरजच्या कानशिलात लगावून पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी संतापलेल्या धिरजने घरात पडलेला धारदार विळ्याने मोहीतवर वार केले. यामध्ये मोहीतच्या पोटाला दुखापत होवून तो गंभीर जखमी झाला.
वार केल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात झाला हजर
वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेला मोहीत हा धिरजच्या घरात सैरावैरा पळू लागला. तो स्वतःला धिरजच्या घरातील बाथरुममध्ये स्वतःला कोंडून घेतले. त्याठिकाणाहून त्याने आपल्या मित्रांना फोन करुन आणि मोबाईलवर लाईव्ह लोकेशन पाठवून घटेनेची माहिती दिली. संतापाच्याभरात घाबरलेल्या धिरजने घराला बाहेरुन कुलूप लावून तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः हजर होवून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस त्याला सोबत घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मोहीतला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. संशयित धीरज प्रल्हाद पाटील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.