धरणगाव (प्रतिनिधी) येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. सी. द. कट्यारे यांनी केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, जळगाव येथे सन २००८ पासून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, न्यायालय सुरू झाले आहे. हल्ली धरणगाव न्यायालयाची नवीन इमारत बांधकाम होऊन तेथे न्यायालयीन कामकाज सुरू आहे. ही इमारत प्रशस्त आहे. धरणगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांची त्वरित स्थापना करण्यात यावी, असेही अॅड. कट्यारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पक्षकारांचा जातो वेळ
१. न्यायालयात दाद मागण्यासाठी तालुक्यातून २० ते २५ किलोमीटर अंतरावरून धरणगाव येथे यावे लागते.
२. त्यानंतर येथून जळगाव येथे पक्षकारांना ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर जावे लागते. तसेच एरंडोल येथील पक्षकारांना देखील एरंडोल न्यायालय येथे येण्यासाठी त्यांच्या गावाहून २० ते २५ किलोमीटर अंतरावरून यावे लागते.
३. नंतर जळगाव येथे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी जावे लागते. त्यामुळे पक्षकारांचा अनाठायी खर्च होतो.
४. वेळेवर पक्षकारांना जळगाव कोर्टात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पक्षकारांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
५ एरंडोल व धरणगाव हे दोन्ही तालुके मिळून असलेल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयाचे कामकाज धरणगाव न्यायालयात सुरू केले तर पक्षकारांचा पैसा व वेळ वाचेल. तसेच पक्षकारांना तत्काळ न्याय मिळेल.
६. तसेच न्याय आपल्या दारी’ ही संकल्पनादेखील साकार होणार आहे. यामुळे या गोष्टीचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.