जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खान्देश सेंट्रल मॉल येथे २७ ते ३० डिसेंबर रोजी करण्यात आले असून या निवड चाचणी स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून खेळाडूंचे आगमन जळगाव शहरात झाले आहे
या स्पर्धेला मुख्य पंच म्हणून नाशिकचे मंगेश गंभीरे तर सहाय्यक पंच म्हणून औरंगाबादचे अमरीश जोशी, नागपुर स्वपनिल बंसोड़ व जळगाव चे प्रवीण ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा संचालिका खान्देश सेंट्रल मॉलच्या मधु जैन यांच्या हस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख हे असतील.
ही स्पर्धा रोज सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ या वेळेत प्रत्येक दिवशी दोन राउंड खेळवले जाणार आहे. तरी जळगाव शहरातील व जिल्ह्यातील नवोदय खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव नंदलाल गादिया यांनी केले आहे.