जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून एकाच नावाचे दोन-दोन, तीन-तीन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने सुरेश दामू भोळे यांना जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधातही एक सुरेश भोळे उभे आहेत. निवडणुकीच्या रिंगणात येथे दोन सुरेश भोळे आहेत. एक भाजपचे तर दुसरे अपक्ष उमेदवार आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांना संधी मिळाली आहे. त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी एक नव्हे तर दोन-दोन जयश्री सुनील महाजन यांनी देखील आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
एकाच नावाचे उमेदवारांपैकी कुणी माघार घेतली नाही तर दोन सुरेश भोळे आणि तीन जयश्री सुनील महाजन नावाचे तीन उमेदवार असू शकतात. तर अपक्ष उमेदवारांना कमळ आणि मशालची साधर्म्य असलेले चिन्ह मिळाल्यास मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, एकाच नावाचे उमेदवार आणि साधर्म्य चिन्ह असल्यामुळे लोकसभेत अनेक मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी हजारो-लांखो मते घेतले होते. विधानसभेलाही असाच गोंधळ झाला तर याचा फटका जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला बसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.