जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल नुकताच जाहिर झाला. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
अनुभूती स्कूलमधून कु. देब्बार्ना दास ही 96.4 टक्के गुणांसह प्रथम आली. तिला गणित याविषयात पैकीच्या पैकी 100 गुण प्राप्त झाले. तर इतिहास-भुगोलमध्ये 98, विज्ञान 96, इंग्रजी 90, हिंदी 92, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 98 गुण मिळाले. दक्ष जतिन हरीया हा विद्यार्थी 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, रिषभ विनोद कुमार हा विद्यार्थी 94.6 टक्क्यांसह तृतीय, तेजस ललितकुमार जैन हा विद्यार्थी 94 टक्क्यांसह चतुर्थ तर प्रसाद प्रदीप नाईक 93.2 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. राष्ट्रीय पातळीवरील आयसीएसईच्या परिक्षेत 2,31,063 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी 1,05,369 विद्यार्थीनी तर 1,25,635 विद्यार्थी यशस्वी झालेत. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलमधून 39 विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालामध्ये 90 टक्क्यांच्यावर 12 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर 80 टक्क्यांच्यावर 21 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विषयानुसार 90 गुणांच्यावर इतिहास-भुगोल 18, हिंदी-मराठी 16, गणित 15, इंग्रजी 8, विज्ञानमध्ये 7 तर कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 14, विद्यार्थी आहेत. संपूर्ण भारतातून आयसीएसई शाळांध्ये अनुभूती स्कूलने आपला ठसा उमटविला आहे.
अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहे. संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जाते. शालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना पर्यावरणापासून ते जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळावी यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जाते. यातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. ‘ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये अभ्यासास अनुकूल वातावरण आहे. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना देखील वाव मिळतो त्यामुळे चौफेर प्रगती विद्यार्थ्यांना करता येते विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले.’ या शब्दात अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासिस दास यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्ष, प्रशस्त ग्रंथालय, तज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच कलागुण जोपासले जातात यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते, वर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर कर्मचारांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाल्याचे सांगत अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.