जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून नव्याने टाकण्यात आलेल्या अमृत योजनेची जलवाहिनी वाघुर जलवाहिनीला जोडण्याचे काम आज हाती घेण्यात आलेले आहे. मुख्य जोडणीसाठी शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येणार असून बुधवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली.
सुप्रीम कॉलनीवासियांना आजवर कधीही नियमीत पाणीपुरवठा झालेला नसून अमृत योजनेंतर्गत परिसरासाठी नव्याने यंत्रणा बसविण्यात आली असून पाणी साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्यासाठी एक व्हॉल्व्ह बसविण्यात आला असून वाघूरच्या मुख्य वाहिनीला जोडणी करण्यास गुरुवारी सुरुवात होणार आहे. बुधवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, भूषण जाधव, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले, शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद
अमृतची जलवाहिनी मुख्य वहिनीला जोडण्यासाठी जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार आहे. सध्याच्या वाघूर जलवाहिनीला प्रिस्ट्स सिमेंट पाईप असून तो काढून त्याठिकाणी ५०० मिमीचा एमएस पाईप जोडला जाणार आहे. उद्या सकाळपासून दिवसरात्र जोडणीचे काम केले जाणार असून त्यानंतर चाचणी घेतली जाणार आहे. जोडणीचे कामामुळे उद्या दि.११ रोजी होणारा शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यापासून सुरळीत पाणी पुरवठा
वाघूरच्या जलवाहिनीला ५०० मिमी व्यासाची लाईन जोडली जाणार असल्याने पुढील ५० वर्ष सुप्रीम कॉलनीची वस्ती वाढली तरी सर्वांना पाणी योग्य पद्धतीने मिळणार आहे. दोन दिवसात जोडणी करून चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.