धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या विरोधात जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यात तलाठ्यांनी देखील काम बंद आंदोलन करत सहभाग नोंदवला होता. परंतु आज सर्व तलाठ्यांनी आपापल्या DSC परत घेऊन कामाला पुन्हा सुरुवात केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या कामाबद्दल काही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आपापल्या DSC २८ एप्रिल २०२१ रोजी कार्यालयात जमा केल्या होत्या. आज दि. ०६ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिकारींसोबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा होऊन DSC ताब्यात घेऊन काम सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व तलाठ्यांनी आपापल्या DSC ताब्यात घेतल्या व कामकाज पूर्ववत सुरू झालं. DSC सुव्यवस्थित मिळाल्याची माहिती धरणगाव तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस. डी. गवई यांनी दिली.
या सर्व प्रकरणाबाबत तहसिलदार नितीनकुमार देवरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, मी नेहमी गोरगरीब नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून माझे काम करत आलो आहे. काही तलाठी लोकांनी नाहक माझ्यावर आरोप प्रत्यारोप करून वेळ वाया घालवला. शेवटी तलाठी देखील माझेच सहकारी कर्मचारी आहेत, त्यांनीही भविष्यात नागरिक व शेतकऱ्यांची कामे विनाविलंब करावीत हीच माझी अपेक्षा आहे.