जळगाव (प्रतिनिधी) वाळूमाफियाच्या ट्रकवर कारवाई केल्याचा राग आल्याने वाळूमाफियाने तहसीलदारांच्या वाहनाचे चालक आणि भोलाणे येथील तलाठी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी वाळूमाफिया पद्माकर नन्नवरे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू उपसावर आळा घालण्यासाठी कोळी हे शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भोलाणे येथील तलाठी मनोहर बाविस्कर, ममुराबाद तलाठी वीरेंद्र पालवे व पोलिस कर्मचारी समाधान पाटील यांच्यासोबत शासकीय वाहनाने निमखेडी शिवारात गस्त घालीत होते. पेट्रोलिंग करीत असताना निमखेडी गावातून जळगावकडे येत असताना पद्माकर नन्नवरे याने चालक मनोज कोळी यांच्याजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. तसेच तुझ्यामुळे माझा वाळू वाहतुकीचा ट्रक पकडला गेला, असे म्हणत त्याने कोळी यांना धक्काबुक्की केली. तसेच तुझी नोकरी खाऊन जाईल, अशी धमकीदेखील दिली.
दरम्यान, हा वाद सुरू असताना पथकातील तलाठी मनोहर बाविस्कर, वीरेंद्र पालवे व समाधान पाटील यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्याने मनोहर बाविस्कर यांनादेखील धक्काबुक्की करीत दुचाकीने तेथून पसार झाला. या प्रकरणी मनोज कोळी यांच्या फिर्यादीवरून पद्माकर नन्नवरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.
















