काबुल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हाती घेऊन आता एक आठवडा झाला आहे. या काळात देश सोडून जाण्यासाठी अनेक अफगाणी नागरिकांनी काबुल विमानतळावर मोठी गर्दी केली असून त्या ठिकाणी तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनच्या लष्कराने दिली आहे.
“अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हातळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे”, असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे विमानतळावरील स्थिती गंभीर होत चालली आहे.
अफगाणिस्तानवरून ८७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान आज (रविवार) पहाटे दिल्लीत दाखल झाले. या नागरिकांना काल (शनिवारी) भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेलं गेलं होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून १६८ नागरिकांना घेऊन परतलं आहे.