धरणगाव (प्रतिनिधी) येथील विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये १९८० ते २००० या कालावधीत धरणगावचे विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी खेळाडूंना व आजी माजी क्रीडा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून विकल्प युथ अँड रुरल डेव्हलपमेंट रिसर्च मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील एकेकाळी नावलौकिक असलेले माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. तद्नंतर आलेल्या अतिथी मान्यवरांचा विकल्प ऑर्गनायझेशन धरणगावच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात आलेले सर्व अतिथी मान्यवर, माजी खेळाडू, क्रीडा शिक्षक यांनी कार्यक्रमाची व कार्यक्रमाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची भरभरून स्तुती केली. माजी खेळाडू, विद्यमान क्रीडा शिक्षक यांच्यासह दिवंगत माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांना मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आल्याने अनेकांचे डोळे पाणावले. बऱ्याच वर्षांनंतर आमची आमच्या गावात कोणीतरी आठवण काढली या भावनेने अनेकांना भरून आले. कै. पी. के. जोशी सरांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या अश्विनीताई जोशी यांनी विकल्प ऑर्गनायझेशन या संस्थेला दरवर्षी २१०० रुपये आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्याची औपचारिक घोषणा करून या वर्षाचा निधी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे यांच्याकडे सुपूर्द केला. कबड्डी, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ हे सांघिक खेळ तसेच रनिंग (१०० मी. – २०० मी.), थाळीफेक, गोळाफेक यांसारख्या व्यक्तिगत खेळांमध्ये सन १९८० ते २००० या कालावधीत विद्यापीठ, राज्य – राष्ट्रीय स्तरावर धरणगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व दिग्गज माजी खेळाडूंचा तसेच आजी माजी क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा २०२१ अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या माजी खेळाडूंचा झाला सन्मान
मीना सिसोदिया (कबड्डी), मधुकर मोराणकर (बुद्धिबळ), सम्राट परिहार, हुसैनी बोहरी, पल्लवी जोशी, स्मिता पवार, हुसैनी बोहरी (व्हॉलीबॉल), भानुदास विसावे (कुस्ती), प्रसन्ना उपासनी (बुद्धिबळ), विलास बयस, सिध्दीराज परिहार, अश्विनी जोशी, नितीन पवार, ज्योती चव्हाण, प्रणाली गुजराथी (व्हॉलीबॉल), समाधान मोरे (बुद्धिबळ), विक्रम राठोड, जाकीर शेख, अंजली परिहार, अनिता पवार (व्हॉलीबॉल), अमर सुरेश पाटील (१०० मी.), कै. भरत देवरे (कुस्ती), रविराज परिहार, सचिन पाटील (बॅडमिंटन), राजूशेख गयासोद्दीन शेख (लांबउडी – १०० & २०० मी.), प्रतिभा सुर्वे (गोळाफेक), कीर्ती पगारीया (व्हॉलीबॉल), शब्बीर बोहरी, कै. सुरेशआप्पा चंदेल, राजेंद्र न्हायदे, इलियास बोहरी, जितेंद्र शिनपुरे, बिपीन भाटीया, विक्रम जोशी, गणेश साहेबराव पाटील, कैलास चिंधू पाटील, वासुदेव रघुनाथ चौधरी (कबड्डी, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट)
या क्रीडा शिक्षकांचा झाला सन्मान
कै. पी. के. जोशी सर, प्रा. ए. जी. शिंदे (सेवानिवृत्त) प्रकाश उत्तम कदम (सेवानिवृत्त), व्ही. पी. महाले (सेवानिवृत्त), अरुण पाटील (सेवानिवृत्त), सचिन लोटन सूर्यवंशी, आर. बी. महाले, के. एस. पाटील, पी. ए. पाटील, डी. एन. पाटील, दिपक एन. पाटील, एम. एम. सय्यद, फिलिफ एफ. गावित, हेमंत ज्ञानेश्वर माळी, अमोल सोनार, संदेश हिरामण महानुभाव, एच. आर. महाजन, आर. ए. बोरसे, बी. जे. मोरे, व्ही. जे. असोदेकर, शैलेश किसन शिरसाठ, एम. डी. परदेशी, विकास शिरसाठ, पंकज रविंद्र ठाकरे
सर्व माजी खेळाडूंच्या वतीने मीना सिसोदिया मॅम व अश्विनीताई जोशी यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आठवणींना उजाळा देत विकल्प ऑर्गनायझेशन चे भरभरून कौतुक केले. क्रीडा शिक्षकांच्या वतीने तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर यांनी कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या. सेवानिवृत्त प्रा. ए. जी. शिंदे सरांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या खेळाडूंनी धरणगावचा नावलौकिक राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं कार्य केलं त्या माजी खेळाडूंचा नामोल्लेख केला. प्रमुख अतिथी मान्यवरांनी देखील राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, भाजपा गटनेते कैलास माळी सर, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील साहेब तसेच हॉकीचे महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक अरविंद खांडेकर साहेब हे देखील उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेबांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सदिच्छा व्यक्त केल्या. विकल्प ऑर्गनायझेशन या संस्थेने ज्या पध्दतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेक वर्षांपूर्वी आपण देखील क्रिकेट च्या स्पर्धांचे आयोजन करत होतो हे सांगून काही निवडक आठवणींना मंत्री महोदयांनी उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सामाजिक समरसता मंचचे सदस्य प्रा. आर. एन. महाजन सर होते. बापू साहेबांनी कार्यक्रमाची व कार्यक्रमाच्या नियोजनाची भरभरून स्तुती केली. तसेच एका महत्वपूर्ण मुद्द्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जर पुढील भावी पिढीचे भवितव्य अबाधित ठेवायचे असेल तर त्यांना मोबाईलच्या विळख्यातून मुक्त करून मैदानी खेळांकडे वळविले पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकासात खेळांचे महत्व पटवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन प्रा. महाजन सरांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.
कार्यक्रमाला धरणगाव तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक, माजी खेळाडू यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेविका अंजलीताई विसावे, त्याचप्रमाणे पत्रकार (प्रिंट मिडिया व डिजिटल मीडिया) यामध्ये आर. डी. महाजन, जितेंद्र महाजन, राजेंद्र वाघ, पी. डी. पाटील, विनोद रोकडे यांच्यासह अभिजित पाटील, महेश पाटील, महेश्वर पाटील, चंदा भावसार, मनोज माळी, प्रफुल पवार, आदी उपस्थित होते. ज्या क्रीडा शिक्षकांना व माजी खेळाडूंना काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, अशी माहिती ‘विकल्प’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अमोल सखाराम महाजन, सहसचिव गणेश चुडामण चौधरी, कार्यक्रम समन्वयक लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रा. रविंद्र मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.