जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु व मध्यम प्रकल्प कोरडेच असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा व नाशिक जिल्ह्यातील पावसाचा काहीसा फायदा झाला असून, गिरणा धरणात सध्या ५७ टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत गिरणा धरणात केवळ १२ टक्केच पाणी होते. दरम्यान चार दिवसांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे खरिपाच्या सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ५२ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा नसल्याने पाणी संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यम प्रकल्पांचा जलसाठा केवळ २७.८४ टक्के तर लघु प्रकल्पांचा साठा १३.४९ टक्क्यांवर आहे. दरम्यान मध्यम प्रकल्पांमध्ये सुकी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंर्तगत सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
गांवर हलक्या पावसाने पिके तरारली
सर्वत्र सध्या सुरू असलेल्या हलक्या पावसाने खरिपाची पिके तरारली आहेत. त्यामुळे मका, सोयाबीन व कडधान्य पिकांना दिलासा मिळाला आहे. दि. २८ रोजी जिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरू होता. दि. २७ रोजी जिल्ह्यात सरासरी ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
















