जळगाव (वृत्तसंस्था) ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकावर जावून आदळली. या अपघातात गौरव उर्फ गणेश घनश्याम सोनार (वय २६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विमानतळासमोर घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे गौरव सोनार हा आई व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून रविवारी ७ जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. त्यावेळी कुसुंबा गावाजवळील विमानतळसमोरील रस्त्यावर अचानक कुत्र आडवे आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यात दुचाकी दुभाजकावर आदळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
अपघातात मयत झालेला गौरव हा घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्यावर दुर्देवी काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतले. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.