नांदेड (वृत्तसंस्था) मोबाइलच्या वादातून एका २३ वर्षीय मोठ्या भावाने त्याच्या २० वर्षीय लहान भावाचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना २५ जून रोजी मध्यरात्री गोपाळचावडी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. अर्जुन राजू गवळे असं मृताचे नाव आहे.
नांदेडच्या सिडको वसाहती शेजारील गोपाळ चावडी येथे वास्तव्यास असलेल्या अर्जुन आणि करण गवळे हे दोघं भाऊ वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास छोट्या अर्जुनने आपला मोठा भाऊ करणकडे मोबाइल मागितला. पण करणने देण्यास नकार दिला. यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. अगदी वाद टोकाला गेल्यामुळे दोघांमध्ये हाणामारीही झाली.
लहान भावाने अंगावर हात उचलल्याचा राग आल्याने करणने अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला, असा आरोप मयत अर्जुन गवळे याचे मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे (रा. सिध्दार्थनगर, नांदेड) यांनी केला. त्यांच्या तक्रारीवरुन सोमवारी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अर्जुन आणि करण या दोघांचेही पितृछत्र हरवले होते. आईच त्यांचा सांभाळ करीत होती. या दोघांची आई पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला आहे. तर हे दोघे जण नांदेडात भाड्याने खोली करून राहत होते. दोघेही मजुरीवर जात होते. परंतु मोबाइल सारख्या शुल्लक गोष्टीवरून भावाचा जीव घेतल्यामुळे समाज मन सुन्न झाले आहे. तर आजच्या तरुणाईला मोबाईलचे वेड जीव घेण्यापर्यंत पोहचले असल्याचे या घटनेच्या निमित्ताने दिसून आले आहे.