नाशिक (प्रतिनिधी) – पती समवेत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या महिलेची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेली. जेहान सर्कल भागात ही घटना घडली. या घटनेत ३३ ग्रॅम वजनाची व सुमारे २ लाख ९० हजार रुपये किमतीच्या दुपदरी मंगळसूत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता बाळासाहेब कासार (रा. गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. कासार दाम्पत्य शनिवारी (दि.९) रात्री जेवण करण्यासाठी जेहान सर्कल भागात गेले होते. जेवण आटोपून ते कार काढण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. पती-पत्नी कारजवळ उभे असताना मोपेड दुचाकीवरून आलेल्या भामट्याने सुजाता कासार यांच्या गळ्यातील २ लाख ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. उपनिरीक्षक भरत पाटील तपास करीत आहेत.
















