जळगाव (सुरेश उज्जैनवाल) व्यक्ती असो वा संघटना… उत्कर्षात सातत्य अपेक्षित असेल तर त्यासाठी एक निकष आहे. उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यात नात्यांची, स्नेहाची, बांधिलकीची जी नवनवी वर्तुळे तयार होतात. त्यातले… म्हणजेच पूर्वीच्या अथवा जुन्या टप्प्यातले कुठलेही वर्तुळ प्रगतीच्या नव्या टप्प्यापर्यंत पोहोचताना वा पोहोचल्यानंतर निखळून पडता कामा नये. ऑलिम्पिकच्या चिन्हांतील वर्तुळांप्रमाणे या सर्व वर्तुळांची सांगड ज्या व्यक्तीला अथवा ज्या संघटनेला जमली ती व्यक्ती अथवा संघटना कधीही अधोगतीला जात नाही.
उत्तर महाराष्ट्रातील भाजपची प्रबळ भूमी अथवा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्हा तब्बल ३० वर्षांपासून आपली आब कायम राखून आहे. जळगाव जिल्ह्यात बहरलेले हे कमळ म्हणजे पक्षातील असंख्य सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ परिश्रमांचे फळ आहे. पक्षाचे वाढते बळ आणि परीघ लक्षात घेत, इतर पक्षांतील संधीसाधू प्रवृत्ती अलीकडच्या काळात भाजपकडे आकर्षित होताना दिसत आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांत संधीसाधूंनी भाजपमध्ये आपली मांड तर पक्की केलीच आहे, शिवाय पक्षातील प्रभावशाली नेत्यांचे खासमखास म्हणूनही ते गणले जाऊ लागले. दुसरीकडे पक्षाच्या शून्य ते सर्वकष या जिल्ह्यातील प्रवासात जी जी म्हणून स्नेहाची, बांधिलकीची, परिश्रमांची जुनी वर्तुळे होती, ती निखळून पडताना दिसत आहेत. निष्ठावंतांची वंचित, उपेक्षित घटक म्हणून नवी ओळख तयार झालेली आहे.
भाजपमधील निष्ठावंताच्या उपेक्षेचा मुद्दा मांडण्याचे औचित्य म्हणजे गेल्या 5 मार्च रोजी झालेला ‘युवा संवाद’ हा कार्यक्रम होय. कमळाच्या जिल्ह्यातील बहराला कारणीभूत ठरलेली अनके जुनी वर्तुळे निखळून पडल्याचेच युवा संवादनिमित्त झालेल्या जाहीर सभेतून प्रकर्षाने समोर आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम युवकांमध्ये नेमका कोणता संदेश पेरून गेला, हे आगामी काळातील घडामोडींतून यथावकाश समोर येईलच, पण “पार्टी विथ डिफ्रंट” म्हणून आपली ओळख असल्याचा दावा करणाऱ्या पक्षात निष्ठावंताची काय स्थिती आहे, हे या कार्यक्रमातच अधोरेखित झालेले आहे. जे गेली अनेक वर्षे जिल्ह्यात पक्षाचे चेहरे म्हणून ओळखले जात होते, त्या पैकी कोण आणि किती चेहरे जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर होते, याची बेरिज केली तर येणारे उत्तर कमालीचे निराशाजनक आहे. किंबहुना शिष्टाचाराचा भाग म्हणून तरी किती जुन्या व निष्ठावंत पदाधिकाऱ्याना पास देण्यात आलेले होते? तर… या प्रश्नाचे उत्तरही निराशाजनक आहे.
५ मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेचे व्यासपीठ डोळ्यासमोर ठेऊन विचार केला तर इतर पक्षातून आलेले व्यासपिठावर पहिल्या रांगेत बसलेले दिसले. दुसरीकडे अनेक निष्ठावंत नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेक्षक तसेच श्रोते म्हणून गर्दीचा एक भाग होते. अर्थात सर्वच निष्ठावंतांना व्यासपीठावर स्थान देता येणे शक्य नाही, असे तांत्रिक दृष्ट्या मानले तरी निदान जे पक्षाचा स्थानिक चेहरा म्हणून जनमानसात स्थान ठेवून आहेत. त्या पैकी दोघा-तिघांना प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावरील मान्यवरांच्या पहिल्या, दुसऱ्या रांगेत स्थान देता आले नसते का?, हा खरा प्रश्न आहे. सभास्थळाचे चित्र पाहिल्या नंतर पक्षाचे ज्येष्ठ संघटक किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, पी. सी. आबा पाटील, सुनिल बढे, पोपट तात्या भोळे, सुरेश धनके (रावेर) या नेते मंडळीला स्थान कुठं होते ?….
प्राप्त माहितीनुसार सभास्थळात प्रवेशासाठी पक्षाचा चेहरा असलेल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना ‘पास’ ही दिला गेला नव्हता. एक दोन पदाधिकाऱ्यांनी तो प्रयत्नपूर्वक मिळविला. मुख्य आयोजकांकडून या पदाधिकाऱ्यांना हा पास सन्मानपूर्वक दिला गेलेला नव्हता, असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. पक्षाचे आमदार, खासदार यांना व्यासपीठावर जरूर स्थान मिळाले, तो त्यांचा सन्मान असू शकतो. पण मग फक्त लोकप्रतिनिधीच पक्षाचा चेहरा ठरतात का? पक्षाचे बलस्थान असलेले संघटनेत पूर्णवेळ धडपडणारे पदाधिकारी किंवा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची काहीच उपयुक्तता नाही का ? ते पक्षात सन्माननीय ठरूच शकत नाहीत का?.
भाजपच्या गेल्या ३०,३५ वर्षांच्या वाटचालीचा मागोवा एक पत्रकार म्हणून घेताना पक्षवाढीसाठी धडपडणाऱ्यांमध्ये जे सध्या प्रमुख नेतृत्व म्हणून भूमिका बजावत आहे ते मंत्री गिरीष महाजन, किशोर काळकर, माजी आमदार स्मिताताई वाघ, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, सुनील बढे, पोपट तात्या भोळे, पी. सी. आबा पाटील, अनंतराव कुलकर्णी, अनिल खंडेलवाल, नारायण दादा पाटील, ऍड. शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, बाबूराव घोंगडे, प्रभाकर पवार (मोठा भाऊ) अशी किती तरी नावे घेता येतील, ज्यांना पक्षासाठी झटताना मी एक पत्रकार म्हणून बघत आलो आहे. पक्षाचा केवळ सत्तेसाठी उपयोग करणाऱ्यांपेक्षा पक्षासाठी अख्खी हयात आणि उमेदीचा काळ खर्ची घालणाऱ्यांची जो पक्ष दखल घेत नाही त्याची खुर्ची एक दिवस जाते… आणि अवस्थाही काँग्रेससारखी होते, हे लक्षात घ्यायला हवे. आता फरक एवढाच की काँग्रेसला या अवस्थेत यायला ५० वर्षे लागली. पण अलीकडच्या काळात वेळ आणि निष्ठा बदलायला जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही !
सुरेश उज्जैनवाल, (ज्येष्ठ पत्रकार, जळगाव)