चंद्रपूर (वृत्तसंस्था) चुलत पुतण्याने आपल्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याबाबत जाब विचारण्यासाठी आलेल्या काकूची पुतण्याने दगडाने ठेचून हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात नेऊन टाकला. ही थरारक घटना सोमवारी दुपारी पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर येथे घडली. पुष्पा मधुकर ठेंगणे (६२) रा. सोनापूर असे मृतक महिलेचे नाव असून धीरज रवींद्र ठेंगणे (२०) रा. सोनापूर असे आरोपीचे नाव आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथील मृतकाची पिडीत सून ही शेतातून दुपारी घरी परत येत होती. त्यावेळी आरोपी हा आपल्याच गुराच्या गोठ्याजवळ काम करीत होते. यावेळी ओझे उचलण्याच्याच बहाण्याने त्याने वहिनीला बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मृतक महिलेच्या सुनेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत घरी पळ काढला. त्यानंतर घडलेला प्रकार तिने सासू पुष्पा ठेंगणे यांना सांगितला.
यानंतर पुष्पा ठेंगणे ह्या पुतण्याला जाब विचारण्यासाठी गेल्या असता धीरज ठेंगणे याने काकूसोबत वाद घालत त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला ओढत बाजूला असलेल्या शेणखताच्या खड्डयात फेकले. काही वेळाने मृतक महिलेचा मुलगा घटनास्थळावर गेला असता तिथे त्याची मृतावस्थेत दिसली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला पोंभुर्णा येथून रात्री उशिरा अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादवी कलम ३५४, ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.