जळगाव (प्रतिनिधी) आज सुप्रीम कोर्टाने जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत म्हणजेच मविप्र प्रकरणी स्व.नरेंद्रअण्णा पाटील संचालक मंडळ वैध असल्याचे स्पष्ट केलं आहे. तर यावेळी भोईटे गटाचा अर्ज फेटाळून लावला आहे.
जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवून भोईटे गटाचे साम्राज्य खालसा केले होते. यानंतर मात्र भोईटे गटाने पुन्हा एकदा समांतर कार्यकारिणी स्थापन करून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातून वाद झाले होते. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द तक्रारी दाखल केल्या होत्या. नूतन मराठातील वादामध्ये तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला रसद पुरविण्याचे आरोप करण्यात आले होते. अलीकडच्या काळात तर अॅड. विजय भास्कर पाटील यांनी या प्रकरणी महाजन, सुनील झंवर आणि भोईटे गटावर अतिशय गंभीर आरोप केले होते. यात आ. गिरीश महाजन हे भोईटे गटाला हाताशी धरून नूतन मराठाची जमीन हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
नूतन मराठातील वाद हा सुप्रीम कोर्टात पोहचला होता. यात संस्थेवर नेमके कुणाचे नियंत्रण राहील ? हा प्रमुख मुद्दा होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देऊन जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेवर दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.