जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आव्हाणे येथील विवाहित शबनमबी इमाम पिंजारी (वय २५) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली होती. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही तरी पिंजारी यांच्या शेजारच्या याच वयाच्या महिलेने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. यामुळे भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेचे पेव आव्हाण्यात फुटू लागले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनमबी इमाम पिंजारी (वय २५) रा. आव्हाणे ता. जि. जळगाव या गृहिणी असून एकत्र कुटुंबात राहतात. पती इमाम युनुस पिंजारी हे हातमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत इमाम युनुस पिंजारी हे विजयी झाले होते. तीन मुलांसह शबनमबी पिंजारी या घरी होत्या, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीने तातडीने घरी धाव घेतली. त्यानंतर नातेवाइकांनी शबनमबी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील माहेरच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शबनमबीचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
शेजारच्या आत्महत्येचा प्रभाव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शबनमबी पिंजारी यांच्या घराशेजारीच तीन महिन्यांपूर्वी एका विवाहितेने अशाच पद्धतीने गळफास घेतला होता. तेव्हापासून त्या अधिकच विचारमग्न राहू लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. मानसिक तणावामुळे सासरची मंडळी त्यांना एकटे सोडतच नव्हती. पती इमाम यांचा वैद्यकीय उपचारावर विश्वास असल्याने उपचार सुरूच होते. अशातच तब्येत खालावत असल्याने काही दिवस नशिराबाद येथे माहेरी आई-वडिलांकडे राहिल्या. तेथेही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरुच होते. बरे वाटत असल्याने आणि पती इमाम पिंजारी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार असल्याने त्या सासरी आल्या आणि पती बिनविरोध निवडून आले.
शबनमबी पिंजारी यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या आसमाबी करीम शेख या महिलेने लॉकडाऊनच्या आधी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेपासून शबनमबी यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्या धक्क्यातून त्या सावरल्याच नव्हत्या. सतत भीती मनात असायची. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.