चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र याने दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर स्वतला झोकून देत आत्महत्या केली. या आत्महत्येच्या मागे आता धक्कादायक कारण समोर आले आहे. केवळ संशयाच्या भुताने जितेंद्र व पूजा वाघ या दांपत्याचे सुखी जीवन व दोन निष्पाप बालके संपवली.
बोरखेडा (ता. चाळीसगाव) येथील जितेंद्र वाघ या जेसीबीचालकाचा विवाह पिंपळगाव येथील पूजाशी २०११ मध्ये झाला होता. या दोघांच्या संसारवेलीवर चिराग व खुशी ही दोन फुले फुलली. चिराग व खुशी यांचं गोंडस व देखणेपण पाहून कोणीही सहजपणे जितेंद्रला तुझी मुले काय देखणी आहेत, असे म्हणत होते व हेच म्हणणे जितेंद्राच्या मनातील संशय वाढवणारे ठरले.
पतीविरूद्ध दिली होती पोलिसात तक्रार
जितेंद्र पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्याबाबत टोमणे मारू लागला. याच कारणावरून दोघांमधील वाद वाढत गेले. पूजाचा छळही वाढत गेला. अखेर पूजाने हा प्रकार आपला भाऊ व काकांना सांगितला. पूजा ही भाऊ व काका-काकूंना घेऊन चाळीसगाव पोलिस ठाण्यात गेली व तीने पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची तक्रार दिली. हे जितेंद्रला कळल्यानंतर तो मुलांना घेऊन बोरखेडा येथे निघून गेला.
चिमुकलीचा वाढदिवसच झाला मृत्यूचा दिवस
जितेंद्रच्या मनात अनेक विचार घर करत होते. पत्नीबाबत मनात संताप होत होता. जितेंद्रने कशीतरी रात्र काढली. रविवारी (ता. १३) खुशीचा पाचवा वाढदिवस होता. ही संधी त्याने साधली व खुशीच्या वाढदिवसानिमित्त आपण बाहेर जाऊ, असे सांगून तो सकाळी आठला घराबाहेर पडला. गावाबाहेरच्या बसस्थानकावर आल्यावर त्याने दोघा मुलांना खाऊ दिला व तो गावाबाहेर निघून गेला. इकडे जितेंद्र मुलांना घेऊन अजून परत का येत नाही म्हणून त्याचे वडील व भाऊ यांनी शोधाशोध सुरू केली. काही नातलगांकडेही त्यांचा तपास केला. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे नगरदेवळा येथील नातलग नाना अहिरे यांनी जितेंद्रच्या वडिलांना फोन करून त्याने नगरदेवळा रेल्वेस्थानकावर मुलांसह केलेल्या आत्महत्येची माहिती सांगितली. त्या वेळी सारे वाघ कुटुंबीय सुन्न झाले. नगरदेवळा रेल्वेस्थानकालगतच त्याने दोघा मुलांना धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली ढकलत स्वतःलाही रेल्वेखाली झोकून दिले. तिघांच्या देहाची छिन्नविछिन्न अवस्था बघून साऱ्यांचे डोळे पाणावले.
















