पुणे (वृत्तसंस्था) एक शिक्षकी शाळेतील शिक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये घडली आहे. शाळेतील १० पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने निराश होऊन या शिक्षकाने आत्महत्या केली असल्याचा उलगडा आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून झाला आहे. अरविंद ज्ञानेश्वर देवकर असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
एकशिक्षकी प्राथमिक शाळेतील १० पैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यामुळे निराश झालेल्या ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. ही शाळा एकशिक्षकी असून या शाळेत केवळ दहा विद्यार्थी होते. त्यातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी शेजारच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतला. सारेच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने नैराश्य वाटल्याने देवकर यांनी ३ ऑगस्ट रोजी शाळेतच तणनाशक प्राशन केले. अरविंद ज्ञानेश्वर देवकर असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्तीतील प्राथमिक शाळेत बदलून आले होते.
अरविंद देवकर यांनी मागील गुरुवारी शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर पाच दिवसांनी हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
याबाबत या शिक्षकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्यांसह शाळेत स्वच्छता करून घेतली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ही बाब घरी सांगितली असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मुलांकडून शाळेची साफसफाई करून घेतली, ही बाब पालकांना खटकल्याने पालकां विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले. दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी शाळा बदलली. हे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताच देवकर यांना नैराश्य आले होते.