नागपूर (वृत्तसंस्था) टिप्परने दुचाकीवर स्वार शिक्षिकेच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. निशिका नरेंद्र ठाकूर (२६, रा. जोगीठाणा पेठ, उमरेड), असे मृतक शिक्षिकेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं ?
मृतक या रिजंट हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मृतकची सहकारी व त्या शाळा आटोपून आपल्या दुचाकीने घरी परतत असताना अचानक मागून आलेल्या टिप्परच्या मागील चाकामध्ये येत निशिकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवित असलेली मैत्रीण ही सुदैवाने बचावली. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी मोठी गर्दी केली होती.
डिसेंबरमध्ये होणार होता विवाह !
मृत निशिका ठाकूर या काही महिन्यांपूर्वीच शिक्षिका म्हणून रिजंट हायस्कूल येथे रुजू झाल्या होत्या. निशिकाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्यानंतर आई आशा यांनी एकुलत्या एक लेकीचा सांभाळ केला. आता निशिका स्वतःच्या पायावर उभी झाल्याने आईची काहीशी चिंता मिटली होती. तसेच निशिकाचा नुकताच साखरपुडा झाला होता तर येत्या ९ डिसेंबरला तीचा विवाह होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शुभमंगल होण्याआधीच तिची प्राणज्योत मालवल्याने आईने काळीज चिरणारा आक्रोश केला होता. शिवाय निशिकाच्या सहकारी शिक्षिका, मैत्रिणींना देखील मोठा धक्का बसला.