धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर.हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत म्हणून शासनाने शाळेला अंतर्गत मूल्यमापनवर निकाल तयार करायला लावला. तो निकाल काल बोर्डाने जाहीर केला.यात पी.आर.हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी रमेश काटवे ही ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम आली.तिला मराठी या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत.आदित्य दिनेश राजपूत हा ९६.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आला आहे तर समीक्षा योगेश बिचवे व नम्रता कडू मराठे यांनी ९६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यालयातील २१४ पैकी २१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तब्बल १८० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर ४० विद्यार्थ्यांना ९० टक्केच्या वर गुण मिळाले आहेत. पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका आशा शिरसाठ आणि शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.