विजयनगर (वृत्तसंस्था) कर्नाटकमधील (Karnataka) विजय नगरमध्ये एका घरात एसीचा (AC) स्फोट झाला आहे. एसीच्या स्फोटात अख्ख कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. विजयनगर जिल्ह्यातील मरियममनहल्ली गावात हि घटना घडली. झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. व्यंकट प्रशांत, त्यांची पत्नी डी. चंद्रकला, त्यांचा मुलगा अधिक आणि मुलगी प्रेरणा अशी मृतांची नावे आहेत.
गॅस गळतीमुळे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन एसीमध्ये आग लागली. आगीमुळे एसीचा जोराचा स्फोट झाला. ही घटना गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली. त्यावेळी संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होतं. अवघ्या काही मिनिटांतच आगीने संपूर्ण घराला वेढले. त्यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबाने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले, त्यांचा खोलीतचं धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. लागलेल्या आगीत एक आख्ख कुटुंब संपलं अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी सांगितली आहे.
आग लागलेलं घर राघवेंद्र शेट्टी यांचे आहे. ही आग त्यांची पत्नी राजश्री हिच्या लक्षात आली त्यामुळे दोघेही घरातून सुखरूप बाहेर पडले. त्यांनी मृत व्यंकट प्रशांतला मोबाईलवर फोन करून तात्काळ बाहेर पडण्याची सुचना दिली. पण, प्रशांत त्याच्या कुटुंबाला बाहेर काढू शकला नाही. जळालेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधिन केले जातील.