बोदवड (प्रतिनिधी) कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात मजुरांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात अपघातात १२ महिला रिक्षाखाली दाबल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत. जखमींमधील द्वारकाबाई जगन्नाथ माळी (वय ५८) या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगावला हलवण्यात आले.हा तालुक्यातील मनूर खुर्द गावाजवळील भवानी मातेच्या मंदिराजवळ झाला.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील मनूर खुर्द येथील शेतकरी जगदेव श्यामराव तायडे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी बारा महिला अॅपेरिक्षा (क्र. एमएच १९ एक्स ९२०२)तून जात होते. गावाजवळील भवानी मातेच्या मंदिराजवळ कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून रिक्षा उलटली. या अपघातात १२ महिला रिक्षाखाली दाबल्या गेल्याने जखमी झाल्या. सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र पाय, डोके तर काहींना कमरेसह पाठीला मुका मार बसल्याने जखमी झाल्या. घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी रुग्णवाहिका घटनास्थळी नेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले. उषा प्रवीण भोई (वय ३५), गुंफाबाई दौलत मराठे, मंगला सोमनाथ माळी, ज्योती नंदकिशोर चांदूरकर, सुमन गुलाब आवारे, सुरेखा प्रकाश माळी, आशा सुरेश कान्हे, मंगला गंभीर कान्हे, लता बाबुराव शेळके या महिलांना पायाला, पाठीला तसेच हाताला जबर मार लागला असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.