धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील दुकान फोडून त्यातील रोकड आणि इतर साहित्य चोरून नेले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील चिंतामणी मोरया परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री केंद्रातील श्री स्वामी समर्थ मुद्रण आणि आयुर्वेदिक औषधीचे दुकान फोडून रोकड आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे अडीच हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी केंद्रातील दान पेटी देखील लांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू फोडण्यात अपयश आल्यामुळे चोरट्यांनी दानपेटी तिथंच सोडून पळ काढला. सकाळी नेहमी प्रमाणे भाविक केंद्रात आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ ईश्वर शिंदे आणि संदीप पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
















