धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील कोरोना बाधीतांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ पाहता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान पाच दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा आज प्रशासनातर्फे करण्यात आली. जनतेने याला सहकार्य करावे, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आजच्या बैठकीत दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहर आणि तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत आहेत. यातच शहरातील संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. या बाबींची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: रूग्णालयात उपचार घेत असतांना प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याशी चर्चा करत त्यांना कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या अनुषंगाने आज धरणगाव नगरपालिका कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक, पत्रकार, व्यापारी संघ पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, पी.आय. हिरे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी गोसावी यांनी सद्यस्थितीची भयावहता नमूद करत कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावर चर्चा झाल्यानंतर धरणगाव शहरात दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जनतेने या कर्फ्यूचे पुरेपूर पालन करून घरातच बसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी याप्रसंगी दिला.
दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान दारूचे दुकानासह सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंदरातील, शैक्षणिक संस्था,शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील. केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील. सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील.
शॉपिंग मार्केट, बियर शॉप, स्पा सलून, लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले बंद रातील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, बंद रातील. पान टपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील. दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मीडिया सेवा, कुरियर, पेट्रोल पंप,अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील.आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय ५०% उपस्थित, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील. आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ,पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील.
रेल्वे, विमान, बससेवा सुरू राहील. वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंध मधून दूध विक्री केंद्रे वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर, ऍम्बुलन्स सेवा, नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना जसे की कृषी विभाग, महावितरण, टेलिफोन, घरपोच सर्वे सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसील कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहील.
धरणगाव नगरपरिषद हद्दीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील यासाठी नगरपालिका कार्यालयाने पथके नेमावी व पोलिस निरीक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरवावा असे आदेशात नमूद आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता १८६० ४५ चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.