पुणे (वृत्तसंस्था) अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता तर नुसती सुरूवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस खात्यातील लोक सामील असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार असा सवाल करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथे आढळलेला मृतदेह या प्रकरणांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने आक्रमक होत याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर काल दिवसभराच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. “आता तर नुसती सुरूवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” असं फडणवीस म्हणाले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले. त्यावेळी मी ते सभागृहात यासाठीच मांडले. की समजा पोलिसमधीलच लोकं अशाप्रकारे जर काम करणार असतील आणि अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो. परंतु दुर्देवाने सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने होत होतं. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचं काम हे सरकारच्यावतीने सातत्याने होत होतं. मला असं वाटतं की आती जी एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे? हे देखील समोर आलेलं आहे.”
तसेच, “परंतु माझं मत असं आहे की, अजुन यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आज एनआयएने आज रिमांड मागितला आहे. परंतु, मनसुख हिरेन हत्याप्रकरण देखील महत्वाचं आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की, तपासयंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.” असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
















