चोपडा (प्रतिनिधी) गुप्त माहितीवरून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसासह तिघांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
दि. १७ ऑक्टोंबर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तीन जण गावठी बनावटीचे कट्टा व जिवंत काडतूस असे उमर्टी ता.वरला जि.बडवाणी येथून सत्रासेनमार्गे चोपड्याकडे मोटरसायकलवर येत आहेत. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ आपल्या पथकातील पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ रावसाहेब पाटील तसेच होमगार्ड प्रदीप शिरसाठ यांना सदर बातमीची माहीती देत कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. त्यानुसार सत्रासेन गावाच्या पुढे असलेल्या फाट्याजवळ संशयित आरोपी येतांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपुस केली असता त्यांनी आपली ओळख मनिष सम्राट थांबेत (वय १९ रा. प्रिप्रांळा ता.जि.जळगाव, नितीन प्रमोद बोरसे (वय १९ रा.इद्रनिल सोसायटी खोटेनगर ता. जि.जळगाव) आणि भायदास लालचंद पावरा (वय २० रा.गौयापाडा ता.चोपडा ह.मु.पूर्णा हॉटेल,जळगाव) असे सांगितले.
तिघांना पोलिसांनी इकडे कशासाठी आले?, बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी झाडाझडती घेतली असता मनिष थांबेत याच्या कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला. तसेच त्याच्या खिशात दोन जिवंत काडतूस मिळून आलीत. यामुळे तिघांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशनला आणत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संशयितांनकडून १ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुस, दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले असून पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर याच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गणेश मधुकर पाटील हे करीत आहेत.