धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका प्रसिद्ध धान्य व्यापाऱ्याकडील ११ लाख रुपये धुळ्याजवळ लुटल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली आहे. अतुल काबरा असे धान्य व्यापाऱ्याचे नाव असल्याचे कळते. दरम्यान, कुणीतरी टीप दिल्याचा पोलिसांना संशय असून धुळे पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
शहरातील प्रसिद्ध धान्य व्यापारी अतुल काबरा हे नेहमी प्रमाणे धुळे येथे सोयाबीनचे पेमेंट घेण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवर त्यांच्यासोबत त्यांचे मुनीम किशोर महाजन हे सोबत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेमेंट घेऊन परत येत असतांना अमळनेर रस्त्यावरील हिमालय पाण्याच्या टाकीच्या कंपनीजवळपास एका स्कुटीवर दोन जण आले. त्यांनी काबरा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संशय आल्यामुळे काबरा यांनी दुचाकी थांबविण्यास नकार दिला. त्यामुळे स्कुटीवरील दोघांनी लाथ मारत काबरा आणि महाजन यांना खाली पाडले. तसेच तुम्ही एका आमच्या एका नातेवाईक मुलीचे नाव घेतल्याचे बतावणी करून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर डिक्कीतील रोकड असलेली पिशवी एकाने बळजबरी हिसकावत दोघांनी पोबारा केला. पिशवीत १० लाख ९२ हजाराची रोकड असल्याचे कळते. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धुळे पोलीस धरणगाव येथे चौकशीसाठी आले असल्याचे कळते. काबरा हे पेमेंट घेऊन येत असल्याची टीप कुणीतरी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून धुळे पोलिसांचा कसून तपास सुरु आहे.