जळगाव (प्रतिनिधी) : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी चांगलीस चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे भाजप नेत्यांना निर्णय घेतांना फार काळजीपुर्वक निर्णय घावा लागला. पक्षांत बंडखोरी होऊ नये, याचा विचार करून सर्वांची समजूत घालत दिपमाला काळे व मनोज चौधरी यांची निवड महापौर अन् उपमहापौर पदासाठी करण्यात आली. आता त्यानंतर स्थायी समिती सभापती व स्वीकृत नगरसेवकांसाठी देखील रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजप ४६, शिवसेना २२, राष्ट्रवादी काँग्रेस १ व एक अपक्ष असे एकुण ७० नगरसेवक सध्या महायुतीकडे आहेत. या सर्वांमध्ये भाजपा हा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत असून सहाजिकच महापौर भाजपाचा व शिवसेनेचा उपमहापौर
होणार हे सर्वश्रुत होते.
त्यानुसार भाजपच्या दिपमाला काळे महापौर व शिवसेनेचे मनोज चौधरी हे उपमहापौर निश्चित झाले असून आता स्थायी समिती सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना आहे. संख्याबळाचा विचार केला असता स्थायी समिती सभापती हा भाजपचाच होणार असून या पदासाठी दिपक सुर्यवंशी व अरविंद देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपाने महापौर पदी लेवा पाटीदार समाजाला संधी दिली असून उपमहापौरपदी तेली चौधरी समाजाला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सामाजिक संतुलन साधण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सभापती पदी मराठा चेहरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे दिपक सूर्यशंशी यांचे नाव चर्चेत आले असून दुसरे नाव म्हणजे ना. गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अरविंद देशमुख यांच्या नावाची देखील चर्चा आहे. पुढील महापौर मराठा समाजाचा देण्याची चर्चा नेत्यांची झाली असल्यामुळे आता स्थायी समिती सभापती पदी अरविंद देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी चढाओढ
गेल्या पंच वार्षिक मध्ये ५ स्वीकृत नगरसेवक होते. आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे भाजपाला ४ स्वीकृत नगरसेवक तर, शिवसेनेला २ आणि शिवसेना ठाकरे गटाला १ नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे. एकुण नगरसेवकांची संख्या ७५आहे. त्यामध्ये भाजपाचे ४६, शिवसेनेचे २२ व एक अपक्ष असे एकुण २३ आणि राष्ट्रवादीचा १ व शिवसेना ठाकरे गटाचे ५ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे ७५ भागीला ७ केल्यास १०.७१ उत्तर येईल, त्यामुळे भाजपच्या ४६ नगरसेवकांना १०.७१ ने भाग दिल्यास ४.२९ उत्तर येत असल्यामुळे भाजपचे चार स्वीकृत नगरसेवक बसतील आणि शिवसेनेच्या २३ नगरसेवकांना १०.७१ ने भाग दिल्यास २.०५ म्हणजेच दोन स्वीकृत नगरसेवक बसतात, तर, ठाकरे गटाच्या ५ नगरसेवकांना १०.७१ ने भाग दिल्यास ०.४६ म्हणजेच १ नगरसेवक स्वीकृत करता येणार आहे. परंतु शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष मिळून सर्वाचि बेरीज करून भाजपचे ५ स्विकृत नगरसेवक करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे मात्र, या सर्वांचेगट वेगवेगळे नोंद झाल्यामुळे सर्वांचे मिळून पाचवा स्वीकृत नगरसेवक करणे कितपत शक्य होईल हे निवडीच्या दिवशीच स्पष्ट होईल.















