जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देव्हारी येथे अवैधरित्या रानडुक्करांची शिकार करणार्या दोघांना जळगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रानडुकराच्या मास, शिकारीच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, अशोक खेमा चव्हाण (वय-57) मोहन खेमा वंजारी (वय-50) दोन्ही रा. देव्हारी ता. जळगाव असे आरोपींचे नावे असून या दोघांनी वन्यप्राणी रानडुकराची अवैधपणे शिकार केल्याची माहिती उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली. त्यानुसार होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिमाजीराव कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.राणे, विटनेर वनपाल गोकूळ चौधरी, वनपाल पी.जे. सोनवणे, वनरक्षक दिपक पाटील, अभिमन मोरे, सी.व्ही.पाटील, महिला वनरक्षक आश्विनी ठाकरे, वैशाली साळी, वाहनचालक डी.डी.पवार यांच्या पथकाने देव्हारी गाव गाठले. याठिकाणी शेतात रानडुकराचे मास भाजत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने दोघांकडून 17 किलो मास, कुर्हाड, विळा हे शिकारीचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, दोघांनी रानडुकराची शिकार करुन बैलगाडीतून ते गावाजवळ असलेल्या शेतात नेले. याठिकाणी दोघेही मास भाजून त्यावर ताव मारणार होते. मात्र ताव मारण्यापूर्वीच वन विभागाने सापळा रचुन दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी वनविभागात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान संशयितांनी मांस कुणाला विक्री केले आहे, काय, यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत, याबाबत तपास केला जात आहे. पुढील तपास श्री वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी राणे करीत आहेत.