जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दादाराव रामदास जोगी (44, भागदरा, जामनेर) व भिवा बाबूलाल गायकवाड (48, मेहुणबारे, ता.चाळीसगाव) अशी स्थानबद्ध संशयीतांची नावे आहेत.
मेहुणबारेतील गुन्हेगार नागपूरात स्थानबद्ध
मेहुणबारे हद्दीतील संशयीत भिवा बाबुलाल गायकवाड याच्याविरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत सहा गुन्हे दाखल असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. आरोपीला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रमेश घडवजे, शामकांत सोनवणे, युनूस शेख इब्राहिम, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, रफीक शेख काळू, दीपक नरवाडे, गोरख चकोर, जितू परदेशी, सुदर्शन घुले, ईश्वर देशमुख आदींच्या पथकाने केली.
जामनेर तालुक्यातील गुन्हेगार येरवड्यात स्थानबद्ध
जामनेर हद्दीतील दादाराव रामदास जोगी (44, भागदरा, जामनेर) याच्याविरोधात जामनेर निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव दाखल केला होता. संशयीताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दहा गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी देताच संशयीताला येरवडा, ता.पुणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.