पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) भल्या पहाटे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई (वय -१८), असे प्रेमी युगलाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या दोन दिवसापूर्वी साक्षीचा विवाह झाला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय वसावे मॅडम, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल झालेत.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पाचोरा तालुका मात्र, हादरून गेलाय. घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे झाला होता. रविवारी ती लग्नानंतर पाचोरा येथे आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांसह समाज मन सुन्न झाले आहे.
रविवारी रात्री जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकमेकांना फोनवरुन बोलणे झाल्यानंतर त्यांनी रात्रीच घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेत भेटायचे ठरवले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून जीवन संपवले. दोघांच्या लग्नाला कुटुंबियांकडून विरोध होता, यातच साक्षीचा विवाह झाला. त्यामुळे माहेरी आल्यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.