जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत विटनेर तांडा गावातील दोन तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली गावात घडली. कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४), आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०) दोन्ही रा. विटनेर तांडा ता. जळगाव मयत झालेल्या दोघांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा या गावात कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे वास्तव्याला होते. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएल ३११) ने येत असताना शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रच्या टावर समोरून शिरसोलीकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या बाईकचे मोठे नुकसान झाले दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे. दरम्यान शेवटची वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
















