चाळीसगाव (प्रतिनिधी) जामदा ते राजमाने दरम्यान शिदवाडी गावाजवळ धुळे मेमू रेल्वेखाली येऊन एका गुरख्यासह आठ जनावरांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजता घडला.
धुळ्याहून चाळीसगावकडे जाणाऱ्या मेमू रेल्वेला शिदवाडी गावाजवळ अपघात झाला. शिदवाडी येथील राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (४५) हा गुराखी गुरे चारून गावाकडे येत होता त्यावेळी अचानक गुरे रेल्वे समोर आली. रेल्वेच्या धडकेत २ गायी, २ बैल, २ म्हशी व १ वासरू, १ पारड्डू अशी ८ जनावरे व गुराखी राजेंद्र सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे एक तास मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर रेल्वे चाळीसगावकडे रवाना करण्यात आले.
भोंग्याच्या आवाजाने बिथरली जनावरे
ठार झालेली जनावरे प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांच्या मालकीची होती. नुकताच ऊसतोडीच्या कामावरून घरी परतलेला राजेंद्र सूर्यवंशी त्यांच्याकडे गुराखी म्हणून कामाला होता. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार झाले आहे. राजेंद्र हा गुरे घेऊन गावाकडे येत असतानाच धुळे मेमू रेल्वेचा भोंगा वाजला. यामुळे जनावरे बिथरली. त्यांनी रेल्वे रुळाच्या दिशेने धूम ठोकली. जनावरे रेल्वेच्या दिशेने धावत असताना त्यांना वाचविण्यासाठी राजेंद्रही त्यांच्यामागे धावला. जनावरांसोबत तोही रेल्वेला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात प्रतापसिंग जाधव यांच्या मालकीचे सर्व पशुधन ठार झाले आहे. त्यांचे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.