दुदैवी घटना : गिरणा नदीत बुडून तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !
जळगाव (प्रतिनिधी) बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा पाण्यात पाय घसरून पडल्याने त्याचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ईश्वर सोमा कोळी (वय-३२ रा. खेडी खुर्द ता. जळगाव), असे मयत झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. तो आईवडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत खेडी खुर्द गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदी काठावर त्यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणीनदीत गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ईश्वर कोळी हा पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान दोन्ही बैल हे सायंकाळी ५ वाजता घरी आले. परंतू ईश्वर कोळी सोबत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गिरणा नदीपात्रात ईश्वरचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आले आहे. तपास पोहेकॉ मुदस्सर काझी हे करीत आहे.