धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवारातील पाट चारीत आज एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
अनोरे शिवारातील पाट चारीत आज दुपारी साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास एका 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सपोनि गणेश आहिरे, पोहेका करीम सय्यद, ईश्वर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहावर कुठलेही जखमा दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे हा अकस्मात मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, मृतदेहाच्या अंगात लाल शर्ट, खाकी पॅंट आणि कानात एकाखाली एक तीन बाली आहेत. धरणगाव पोलिसांनी 8999153131 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे शवविच्छेदनासाठी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.