नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार निवडणुका पार पडल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला अडून दीड वर्ष पूर्ण झालेलं नाही, पण दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकदाही कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. त्यातही सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे केंद्रीय कॅबिनेटमध्ये चार मंत्रिपदं रिक्त आहेत.
महाराष्ट्राच्या दृष्टीनंही हा विस्तार महत्वाचा असेल. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजे जवळपास वर्षभरापासून या खात्याचा अतिरिक्त भार हे प्रकाश जावडेकर सांभाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून भाजप कुणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं असेल. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात संवेदनशील बनत चालल्यानं मराठाच मंत्री भाजप केंद्रात पाठवणार का याचीही चर्चा आहे. शिवाय मंत्रिमंडळात काही बदलही होण्याची शक्यता आहे. परफॉर्मन्सनुसार काही मंत्र्यांच्या खात्यात हा बदल मोदी प्रत्येक विस्तारावेळी करत आलेत. त्यामुळे ती परंपरा याहीवेळा कायम राहते का हे पाहणं महत्वाचं असेल. मोदींच्या मंत्रिमंडळाचं सध्याचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या कॅबिनेटमध्ये एकही मित्रपक्ष नाही. शतप्रतिशत भाजप असलेलं हे कॅबिनेट आहे. सध्या केवळ आठवले हे एकटेच मित्रपक्ष म्हणून सोबत आहेत. पण ते कॅबिनेटमध्ये नाहीयत, तर राज्यमंत्री आहेत. त्यामुळे जेडीयूला कॅबिनेटमध्ये संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.
पुढच्या वर्षी मार्च एप्रिलमध्येच बंगाल, आसामच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे बंगाल, आसामधून कुणाचा तरी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. भाजपच्या बंगालच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच मध्यप्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे हे देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतील. बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले गेलेले सुशीलकुमार मोदी यांना आता केंद्रात आणलं जाणार का हेही पाहणं औत्सुक्याचं असेल.