
जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या जळगाव परिमंडलाच्या ‘वारी’ नाटकातील कलावंतांचा मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. कलावंतांच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे कौतुक करत त्यांनी आगामी अंतिम फेरीसाठी संपूर्ण संघाला शुभेच्छा दिल्या.
मुख्य अभियंता मुलाणी हे ‘वारी’ नाटकाचे निर्माते आहेत, तर अधीक्षक अभियंता मदन सांगळे सहनिर्माते आहेत. त्यांनी नाट्य कलावंत आणि तंत्रज्ञांचा गौरव करून त्यांच्या कलात्मक योगदानाला दाद दिली. नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाने मिळवलेले विजेतेपद ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत मुलाणी यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. अंतिम फेरीतही उत्कृष्ट सादरीकरण करून जळगाव परिमंडलाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सत्कारामुळे कलावंतांचा उत्साह वाढला असून, अंतिम फेरीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि जळगाव परिमंडलांनी सहभाग घेतला. जळगाव परिमंडलातर्फे डॉ. समीर मोने लिखित आणि सागर सदावर्ते दिग्दर्शित ‘वारी’ या नाटकाने आशयघन कथानक, प्रभावी अभिनय, कल्पक नेपथ्य, अचूक प्रकाशयोजना आणि पूरक संगीताच्या जोरावर विजेतेपद पटकावले. दिग्दर्शनासाठी सागर सदावर्ते, नेपथ्यासाठी कमलेश भोळे, प्रकाश योजनेसाठी रवींद्र चौधरी, संगीतासाठी आशिष कासार आणि रंगभूषा व वेशभूषेसाठी दीपक कोळी यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली. अभिनयात राहुल निकम यांना द्वितीय तर दीपाली नरवाडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी आणि गीतार्थ भोळे यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले.
मुख्य अभियंता मुलाणी यांच्या हस्ते नाटकातील कलावंत राहुल निकम, सागर सदावर्ते, दीपक कोळी, दीपाली नरवाडे, भीमराव सपकाळे, जागृती वाकेकर, रवींद्र चौधरी, कमलेश भोळे, भावना चिडाम, श्रीकृष्ण ठाकूर, अक्षय पाटील, दीपक वंजारी, सचिन भावसार, त्रिकाल अधाने, पूनम दडमल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता मदन सांगळे, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्य अभियंत्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ‘वारी’च्या संघाचा आत्मविश्वास वाढला असून, अंतिम फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कलावंत उत्सुक आहेत.

















