धरणगाव (प्रतिनिधी) डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा धरणगावकरांना सहन कराव्या लागत आहेत. आजच्या घडीला ९ ते १० दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना धडकी भरलीय की, हिवाळ्यात ही परिस्थिती आहे, तर उन्हाळ्यात काय होईल?.
धरणगाव शहरात चक्क हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचं चित्र आहे. धरणगाव शहरात तब्बल महिनाभरांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. हिवाळ्यातच तीव्र अशा पाणी टंचाईमुळे घरातील महिला पुरुषांसह शाळकरी मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धरणगावात नेहमी एक दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसाआड तर कधी महिनाभरानंतर तर कधी याठिकाणी पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दुसरीकडे काही पदाधिकारी दर आठवड्याला कधी जलशुद्धीकरण केंद्र तर कधी धावडा येथील पाणी पुरवठा केंद्रावर भेट देऊन आता लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशा सोशल मीडियातून थापा मारत असतात. परंतु पाणी टंचाईचे वास्तव स्वीकारायला कुणीही तयार होत नाहीय. भाजपचे सोशल मिडिया प्रमुख टोनी महाजन यांनी पाणी टंचाईच्या मुख्य समस्येवर बोट ठेवले होते. दरम्यान, डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी आहे. शहरातील विविध व्हाटसग्रुपवर याबाबत कायम नागरिक आपले गऱ्हाणे मांडत संताप व्यक्त करत असतात.