धरणगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा खंडित असताना सत्ताधारी पाणीपुरवठा मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मशगुल आहेत. यामुळे जनमानसात आता प्रचंड संतापाची लाट उसळली असून गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा संतप्त इशारा भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील आणि शहरध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिला आहे.
अॅड. संजय महाजन म्हणाले की, धरणगावात एप्रिल महिन्यापासून नळांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु असताना सत्ताधारी शिवसेना मात्र पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस साजरा करतेय. पालकमंत्री जिल्ह्याबाहेर पाण्याच्या विविध योजना जाहीर करतात. दुसरीकडे मात्र, त्यांच्याच मतदार संघातील सर्वात मोठे असलेल्या धरणगावात मागील वीस ते बावीस दिवसापासून पाणी पुरवठा नाहीय. भर उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. जर धरणगावच्या पाण्याची समस्या सुटत नसेल तर राज्याचं पाणीपुरवठा मंत्रीपद फक्त शोपीस आहे का?, असा संतप्त सवाल देखील अॅड. महाजन यांनी विचारला आहे. शहरात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण सुरु आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास आता भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अॅड. संजय महाजन यांच्यासह तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन आणि सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
















