मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमच बघा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना, जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल, तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी, असे खुले चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं, माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे. पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली, तिकडे मी असणारच आणि ती नेटाने पार पाडणार. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमच बघा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. यापूर्वी, भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावे, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसंदर्भात म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत खुले आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.