रावेर (प्रतिनिधी) पेट्रोलपंपाशी संबंधित स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी वजन माप निरीक्षकाला ३२ हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीने रंगेहात पकडले आहे. सुनिल रामदास खैरनार (वय-५६, रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवाशी असून त्यांनी रावेर येथे ११ महिन्यांच्या करारावर पेट्रोलपंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त रावेर येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सुनिल खैरनार यांनी ३२ हजाराची मागणी केली. परंतू तक्रारदार यांची लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून ३२ हजाराची लाच स्विकारतांना निरीक्षक सुनिल खैरनार यांना रंगेहात पकडले.