धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोविड काळानंतर बर्याच दिवसांनी शाळेत यायला मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच शाळेने सुरु केलेल्या हेल्थ क्लबमध्ये डॉ. साक्षी बोरसे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ.आशा शिरसाठ, ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, उमाकांत बोरसे, व्ही. एच. चौधरी, एनसीसी मेजर डी. एस. पाटील, डॉ. वैशाली गालापुरे आणि शिक्षक बंधूंनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचा संपूर्ण परिसराचे निर्जतुकीकरण केले असून शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुन शाळा सुरू करण्यात आली आहे. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता आठवी ते दहावीच्या ७६४ विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. शाळेचे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत.