धाराशिव (वृत्तसंस्था) तालुक्यातील वाणेवाडी येथील दयानंद अनंत घुटुकडे ( ३४) या तरूणाला शेततळ्यातील पाण्यात पोहताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, कुटुबिंयाच्या इच्छेनुसार मृताचे दोन्ही डोळे दान करण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथील दयानंद घुटूकडे हे सोमवारी हिंगळजवाडी शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी आपल्या सोबत दोन लहान मुली व शेजारच्या मुलींनाही नेले होते. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसला. यामुळे दयानंद हे पाण्यात बुडाले. यावेळी मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दयानंद यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दयानंद यांचा मृतदेह तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी गावकरी व मृताच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन दयानंद यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.