नशिराबाद (सुनिल महाजन) शेतकऱ्यांच्या शेतीच्या किंमतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोटखराब क्षेत्र वर्ग अ लागवडीखाली असल्यास वहिती क्षेत्रात समायोजन होण्यासाठी, शासनाच्या नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद शहरतर्फे शासकीय अर्ज भरून देण्याचे अभियान राबविण्यात आले.
गेल्या कित्येक दशकांपासून किंबहुना ब्रिटिश राजवटीत शेतीची झालेली मोजणी व त्यानुसार सातबार्यावर घेतलेल्या नोंदी या काळानुरूप अडचणीच्या व जाचक ठरू लागल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सातबारावर असलेले पोटखराब क्षेत्र, ज्याच्यामुळे जमिनीचा आकार मूल्य कमी असते, तसेच शासकीय दरांमध्ये संबंधित क्षेत्रात फार कमी म्हणजे नगण्य असलेली किंमत, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा व्यवहार करताना किंवा कर्ज घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. एकूणच पोटखराब क्षेत्राचा मोबदला शेतकर्यांना अत्यल्प स्वरूपात मिळत होता. काळानुरूप प्रत्येक भागात बदल घडत असतात. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शासकीय अर्ज भरून देण्याचे अभियान राबविण्यात आले.