रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना १० हजारांची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सुमारे ४ महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करुन वाहन जप्त केले होते. हे वाहन सोडवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला १५ हजाराची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजारांची स्वीकारताना त्यांना निंभोरा येथे जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
या प्रकरणातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला वाहन देण्यासंदर्भात आदेश ही दिले होते. परंतु निंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६) हे वाहन देण्यासाठी टाळाटाळ करत होते. म्हणून तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली होती. त्यानंतर १२ जून रोजी दुपारी ३ वाजता निंभोरा गावातील मरी माता मंदिराजवळ १० हजाराची लाच घेताना कैलास ठाकूर हे सापळ्यात अडकले.
ही कारवाई ही एसीबीचे उपअधीक्षक सुहास देशमुख, निरीक्षक अमोल वालझाडे, निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो. हे. कॉ. रवींद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनील वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. गणेश ठाकूर, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे आदींनी केली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक कैलास विश्वनाथ ठाकूर यांना लाच घेताना ताब्यात घेतल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कैलास ठाकूर गत ६ ते ७ महिन्यांपासून निंभोरा पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यकाळ दीड ते दोन वर्षे राहिलेले असतानाच ते सापळ्यात अडकले आहेत. ज्या पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.