धरणगाव (प्रतिनिधी) शनिवारी रात्री संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. परिणामी घरांमध्ये व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, अशा कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले आहे.
मुसळधार पाऊस झाल्याने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी रविवारी सकाळी तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यात फुलपाट, आव्हानी, टाहाकळी, धार, शेरी, अंजनविहीरे, खामखेडे, पथराड बुद्रुक व खुर्द, दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, मुसळी या गावांना भेटी दिल्या. पाळधी गावात पाणी साचलेले होते. नालयात अडकलेले कचरा, झाडेझूडपे काढण्यासाठी त्वरित जेसीबी पाठविण्यात आले. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत झाली. तसेच शेतीचे व ज्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. नुसती पाहणी न करता लोकांसोबत खांद्याला खांदा लावून प्रतापभाऊ यांनी शेतकऱ्यांना मदत केली. तर दुसरीकडे पाळधी गावात दुकानांमध्ये व पोलीस ठाण्यात पाणी शिरल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.